सावरकर-
एक शोध
सावरकर
एक शोध ह्या लेखमालिकेचा हा अखेरचा भाग, ह्या भागात उरलेल्या दोन आक्षेपांचा विचार करू.
३) सावरकरांनी त्यांनी हिंदुमहासभेचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्यांनी त्यांच्या हिंदुत्व ह्या ग्रंथात त्यांची हिंदुत्वाची व्याख्या सांगितली होती. त्या व्याख्येत त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे कि ' ह्या देशात राहणारा मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असला तरी जर तो ह्या देशास त्याची मातृभूमी- पुण्यभूमी मानत असेल तर तो हिंदू' आता हि संपूर्ण व्याख्या बघितली तर त्यातून हे नक्कीच कळेल कि ह्यात कुठल्याच जातीला व पंथाला विरोध नाही. त्यामुळे सावरकरांचे हे खरे विचार असतील तर आज त्यांच्याच अनुयायांनी त्यांच्या ह्या विचारांशी फारकत घेतली आहे. सावरकरांनी मांडलेली स्वतंत्र भारताची संकल्पना त्यात त्यांनी सर्व जाती, धर्मांना समान वागणूक मिळेल असाच सांगितले आहे. वरील विचार बघता त्यांच्या ह्या विचारांना विरोध करण्याचे काहीच कारण नाही. ह्या वरील आक्षेपालाच धरून एक अजून आरोप केला जातो तो म्हणजे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांधरून त मांडण्याचा. द्विराष्ट्रवाद म्हणजे ह्या देशात मुस्लिम व हिंदू हि दोन राष्ट्रे आहेत असा सिद्धांत. मुळात असा सिद्धांत १८८७ साली अलिगढ चळवळीचे प्रणेते सय्यद अहमद खान यांनीच मांडली होती. मुस्लिम लीग जेव्हा स्थापन झाली तेव्हाही त्यांच्या अनेक उद्द्येश्यांपैकी मुस्लिमांचे स्वतंत्र राष्ट्र असावे हेही एक होते. ह्यावरून एक लक्षात येते कि पाकिस्तानची संकल्पना हि मुळात लीगचीच आहे.१९३२ साली लंडन मध्ये रहमत अली यांनी पाकिस्तान साठी मोहीम काढतली होती व पाकिस्तान हे नाव त्यांनीच दिले. डॉ. आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या.' thoughts on pakistan ' ह्या ग्रंथात ह्या द्विराष्ट्र वादाचे श्रेय मुस्लिमम लीगलाच दिले आहे. त्यामुळे सावरकरांनी द्विराष्ट्रवाद मांडला हे चुकीचे आहे. त्यामुळे हा आरोप तसाही बादच होतो.
४) गांधी हत्या आणि सावरकर हा सर्वातजास्त चर्चिला गेलेला व सर्वात वादग्रस्त आरोप आहे. नथुराम गोडसेने ३० जाने. १९४८ साली गांधींचा खून केला, ह्या कटात सावरकरांचा हात होता हा मुख्य आरोप त्यांच्यावर होता व त्यामुळे त्यांना अटक झाली होती. नथुरामचा साथीदार बागडे हा नांतर माफीचा साक्षीदार झाला त्याने सावरकरांच्या विरोधात साक्ष दिली होती. ह्या खटल्यात सावरकरांच्या विरोधात ठोस पुरावा न मिळाल्यामुळे सावरकरांना सोडण्यात आले.
१९६५ साली जेव्हा ह्या गोष्टीसाठी कपूर आयोग नेमला होता तेव्हा ह्या आयोगाने ह्यात सावरकरांचा हात होता असे मत मांडले होते. बागडेंची साक्ष त्यांनी ग्राह्य मानली होती. आता हा वरील सर्व भाग बघितला कि काही महत्वाचे प्रश्न पडतात, गांधीहत्येच्या वेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते व तेव्हा सत्तेत असलेले नेहरू, आंबेडकर, पटेल वगैरे हि लोकं सावरकरांची वैचारिक विरोधकच होती. त्यांच्यापैकी कोणीही सावरकरांच्या सुटकेबाबत काहीही मत व्यक्त केल्याचं दिसत नाही. त्यांच्यापैकी कोणीच ह्या निर्णयाबद्दल पुढे अपील केलेलं नाही कि राग व्यक्त केलेला नाही. १९६५ साली जेव्हा कपूर आयोग आला तेव्हा सुद्धा सत्तेत काँग्रेसंच होती आणि तेव्हाही ह्या आयोगाच्या अहवालावर कोणीच काहीच बोललेलं नाही, मुळात हा आयोग जर सरकारनेच नेमलेला होता तर मग ह्याचा अहवाल दडपला का गेला ह्या बद्दल त्याचवेळी कोणी प्रश्न विचारले? पुढे १९८३ साली जेव्हा इंदिरा गांधी सरकारने सावरकरांच्या नावाने टपाल तिकीट काढला तेव्हा हे प्रश्न सरकारला विचारले गेले होते का? जर गेले होते तर त्यावेळी सरकारने त्यांना काय उत्तरं दिली हे पण प्रसिद्ध व्हायला हवे. म्हणजे जर ह्या आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर त्याची सखोल चौकशी होऊन ते लोकांसमोर आलेच पाहिजे मग जे सत्य असेल ते सर्वांनीच स्वीकारायला हवे. अलीकडेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनी ' सावरकरांना विरोध नाही पण त्यांच्या हिंदुत्वाला आहे' असे मत मांडले मग त्यांना का नाही प्रश विचारले गेले? वरील खटला काय होता हे इथे विस्तारभयास्तव सांगितलेले नाही पण हा खटला तसा जवळपास सर्वश्रुत आहे.
सावरकर-
एक शोध ह्या लेखमालिकेचा हा शेवटचा भाग, ह्या लेख मालिकेत भरपूर चुका असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विस्ताराने लिहायची गरज होती पण लिहिले गेले नाहीये, बऱ्याच अर्थांनी ती अपूर्ण सुद्धा आहे. पण एक मत मांडावसं वाटतं कि आपल्याकडे एखाद्याचं चारित्र्यहनन करायचं ठरवलं तर आपण किती खालच्या पातळीवर जातो हे सावरकरांच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसतं. भारतीय मानसिकता अजूनही प्रगल्भतेच्या कित्येक दूर आहे असंच दिसून येते. आपण ऐतिहासिक पुरुषांच्या विचारांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या नावाने वादंग करण्यातच धन्यता मानतो, कदाचित यातच आपल्या गुलामगिरीचं रहस्य दडलेलं असेल.
Comments
Post a Comment