किती सुंदरा हाल होवोनि मेल्या
' किती शांमुखी जाहजी फाकविल्या , किती सुंदर हाल होवोनि मेल्या ' हि संत रामदासांनी लिहिलेली ओळ आजच्या काळाला सुद्धा कितीत समर्पक ठरते हे वाचून खरंच मन सुन्न होतं. रोज वर्तमानपत्र उघडलं कि कुठे ना कुठे ह्या असल्या अत्याचारांच्या बातम्या वाचाव्या लागतात आणि आपल्या मनाला अजून एक जखम होऊन जाते. सध्या हैदराबाद येथे एका पशु वैद्यक तरुणीवर अत्याचार करून तिच्या झालेल्या खुनामुळे आता हे सर्वच विषय परत एकदा ऐरणीवर आले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर त्या आरोपींचा झालेला एन्काउंटर व त्याला समाजातून मिळणारं समर्थन वगैरे गोष्टींनी समाज ठवळून निघाला आहे. ह्या सर्वच गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आता वाटायला बाळगलेली आहे. कायद्याचं भय, आपल्या समाजाची मानसिकता, समाजाचा कायद्यांवरचा उडत चाललेला विश्वास ? ह्या सर्वच प्रमुख मुद्द्यांचा विचार करण्यासाठी हा आजचा लेख.
आपल्याला आधी हे मान्यच करायला हवं कि आपल्या कडे ह्या असल्या घटना खरोखरीच वारंवार घडत आहेत व त्याकडे गांभीर्याने कोणीच बघत नाही. 'रोज मरे त्याला कोण रडे ' अश्या सारखी अवस्था आपली सध्या झाली आहे, इतके आपण सुस्त झालो आहोत. मध्येच कधीतरी ह्या गोष्टीवरून आंदोलने होतात. संसदेत कायद्यांची निर्मिती होते, दोषींना शिक्षा होते पण थोड्या काळानंतर पुन्हा सगळं कसा थंड थंड होऊन जातं. राजकारणी लोक, समजविघातक लोक मग ह्या असल्या गोष्टींचा फायदा घेतात व काम संपल्यावर सगळं कसं जैसे थेच. ह्या गोष्टींवर सगळ्या भावनिक अतिरेक्यांना बाजूला ठेवून नीट शांत डोक्याने वास्तववादी विचार करण्याची कोणाचीच तयारी नाही हे सर्वात जास्त भयानक व विचित्र आहे.
आता ह्या घटनांमागची कारणं शोधायची म्हटलं तर सांगणं थोडं अवघड आहे ह्याचं कारण म्हणजे माणसाच्या मनातील गोष्टींना, विकृतींना कोणीच हात लावू शकत नाही. पण ह्या सर्वांहून मुख्य म्हणजे आपल्याकडे स्त्री- पुरुष संबंध ह्या गोष्टींना सतत कुठ्लेनाकुठलेतरी मुलामे देऊन एकतर त्यांना पवित्र नाहीतर किळसवाणे रूप देण्याचा प्रयत्न केला जातो. लैंगिकता व लैंगिक शिक्षण ह्यांसारख्या गोष्टी आपल्या समाजात शिव्यांच्या बरोबरीचं स्थान ठेवून आहेत. प्रत्येक गोष्टीला सांस्कृतिक महत्व देणं हे किती मूर्खपणाचं आहे! पौगंडावस्थेतील मुलांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं , लैंगिक गोष्टींबद्दल आकर्षण वाटणं तसेच त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता ह्या गोष्टी पूर्णपणे नैसर्गिक आहेत हे कितीजण खुलेपणाने मान्य करतात ? किती कुटुंबांत ह्या गोष्टींबद्दल खुलेपणाने बोललं जातं, किती जण ह्या गोष्टींना अपवित्र वगैरे मानत नाहीत ? अश्या गोष्टी आपल्या समाजात खरंच घडतात का ? आपल्याकडे बजरंग दल वगैरे संघटनांनी कपल्सची लग्न लावून देणं वगैरे सारख्या अतिशय अतिरेकी आणि मूर्खपणाच्या गोष्टी केल्या जातात त्याबद्दल काहीच कसा विरोध होत नाही? मध्ये शबरीमला निवाड्या विरोधात उसळलेला जनक्षोभ काय दर्शवितो? एकीकडे या निर्णयास विरोध आणि एकीकडे बलात्काऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी आंदोलने केवढा विरोधाभास आहे हा ? आपल्या समाजात आजही स्त्रीला खरंच मानाचं स्थान मिळतं का? आजही त्यांनी स्वतःच्या बळावर- हिंमतीवर काहीतरी करून दाखवावं यासाठी किती प्रोत्साहन मिळतं ? स्त्रियांसाठी आपण करत असलेला व्यवहार हा खरंच सुधारकेक आहे? हे सर्व प्रश खरंच आपल्याला भंडावत नाहीत ?
ह्या सर्व गोष्टींवर सोपा उपाय म्हणून कायदा किंवा त्यांना हिटलरशाही शिक्षा यांसारख्या गोष्टींची मागणी होते हे साफ चुकीचे आहे. कायदा हे प्रत्येक गोष्टीवरच उत्तर असूच शकत नाही , कारण कायदा आलं की त्याचा दुरुपयोग आला , तितक्याच त्यातून निसटण्याचा पळवाटाही आल्या, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला आहे का? बरे समजा कायदा केलाच तरी त्यातून खरोखरीच ह्या सर्व गोष्टींना आला बसेल हे कशावरून? ह्या सर्व गोष्टी थांबतीलच हे कशावरून ? कायदा हाच प्रत्येक गोष्टीवर उपाय असेल किंवा सुप्रीम कोर्टने निकाल देऊन समाजातील वास्तव स्थितीत बदल घडतो , असं समजणं किती चुकीचं आहे हे नवी दिल्ली येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लाँ ने २०१८ साली केलेल्या फाशीच्या शिक्षे संबंधात केलेल्या
एका सर्वेक्षणात दिसून येते. फक्त महाराष्ट्रा पुरता विचार करायचा जरी म्हटलं तरी संपूर्ण २०१८ ह्या वर्षात तब्बल १६ जणांना फाशीची शिक्षा सुनावली गेली त्यात ७ जण हे लैंगिक अत्याचार ह्या गुन्ह्याशी संबंधित होते. हे फक्त २०१८ पुरता मर्यादित झालं पण आत्ताच घडलेली हैदराबाद येथील घटना असो , किंवा डिसेंबर २०१८ मध्ये घडलेली उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील घटना असो, किंवा २०१६ साली झालेली महाराष्ट्रातील कोपर्डीची घटना असो, ह्यात एक सामान धागा आहे आणि तो म्हणजे ह्यातील अत्याचारास बळी पडलेल्या मुलींची झालेली हत्या , आणि ह्यातून हेच सूचित होते की कायदा किंवा कायद्याचं भय हे माणसातील विकृतीला कधीच लगाम घालू शकत नाही त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत तेव्हाच कायदा आपला प्रभाव पडू शकेल. कायद्यातून पळवाट निघू शकते ह्याचा पुरावा म्हणजे २०१२ साली झालेल्या निर्भया हत्याकांडातील आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.
आता ह्या सगळ्यावर उपाय म्हणून काही कुटुंब व समाजातील काही घटक हे त्यांच्या मुलींवर- सुनांवर सर्रास बंधन आणतात पण हीच लागण आता शिक्षण संस्थांनाही झालेली दिसते ह्याचा उदाहरण म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वी घडलेले मराठवाडा विद्यापीठातील प्रकार ह्यातून फक्त मुलींचाच नाही तर पर्यायाने संपूर्ण तरुणाईचा बळी जातो हे निश्चित .
म्हणूनच
आपल्याला हे मान्यच करायला हवं कि ह्या सगळ्याचं मूळ हे मानसिकता आहे. जोपर्यंत त्यात काही बदल होत नाही तोपर्यंत काहीच हाती लागणार नाही. आपल्याकडे भावनेचा अतिरेक टाळून खरोखरच साधकबाधक चर्चा करून, मुळापासून काम करावे लागेल तेव्हाच ह्या गोष्टींसाठी केलेले कायदे आपला प्रभाव पडू शकतील. जाता जात आता हैदराबाद च्या घटनेतील आरोपींचा झालेला एन्काउंटर व त्याला मिळालेला प्रचंड समर्थन हे चिंताजनकच आहे. हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने येथे सविस्तर बोलत नाही.
शेवटी मुद्दा हाच येतो कि अश्या अजून किती सुंदऱ्याना बळी जावे लागणार आहे , कि ज्याने समाजाला जाग येईल? समाजातील प्रगल्भता, वैचारिकता व एकमेकांमधील संवाद ह्या गोष्टी खूपच कमी होत चाललेल्या आहे जे खरोखरीच चिंताजनक आहे. हा लेख बऱ्याच जणांना अर्धवट, अपुरा वाटू शकतो पण लेखकाचा मला असा दावाच नाही हे जे मांडलंय तेच अंतिम असेल पण हि चर्चेची सुरुवात ठरावी अशी अपेक्षा. ह्यावर सर्व समाजात नीट चर्चा व्हायला हवी व ह्याबद्दल एक व्यापक जनमत तयार व्हावे अशीच अपेक्षा. व. पु. काळेंनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की " स्त्री देहाचं रक्षण कोणीतरी अज्ञात श्रीकृष्ण करत असावा नाहीतर वासनांच्या नजरांनी तो चितेवर चढण्याआधीच जाळून गेला असता " आता सुद्धा अश्याच एका श्रीकृष्णाला अवतार घेण्याची गरज आहे पण ह्यावेळेस तो श्रीकृष्ण एखादी व्यक्ती नसून प्रगल्भ समाज असावा हीच अपेक्षा.
Comments
Post a Comment