सावरकर- एक शोध -भाग
मागील लेखात आपण सावरकरांच्या व्यक्तिमत्व विचारधारेबद्दल बघितले, आजच्या लेखाचा मूळ उद्देश हा सावरकरांवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांवर प्रकाश टाकण्याचा आहे. सावरकरांवर घेतले जाणारे आक्षेप चार आहेत.
) त्यांनी अंदमानातून पाठवलेले माफीपत्र
) त्यांची स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहाशी फारकत
) त्यांची हिंदुत्वाची संकल्पना द्विराष्ट्रवाद
) गांधी हत्येतील त्यांचा सहभाग
वरील मुद्दे पाहता हे सर्व आक्षेपांमधील मुख्य आहेत म्हणून घेतले आहेत. ह्या लेखाचा मूळ उद्देश ह्या आक्षेपांचे खंडन करणे हा नसून त्या आक्षेपांचा मागोवा घेऊन त्यांचा आजच्या  काळाशी काही संबंध आहे का हे तपासणे हा आहे.
मुळात भूतकाळात घडलेल्या प्रत्येक घटनेचा वर्तमानाशी संबंध असतो हे मान्य जरी केले इथे हे वरील सर्व आक्षेप आज जर भाजप त्यांचे समविचारी पक्ष सत्तेत नसते तर विचारात आले असते का हा मुख्य मुद्दा आहे.
) आज सावरकरांच्या माफीपत्रावरून सर्व देशभर गदारोळ सुरु आहे. मुळात ह्या पत्रामागची पार्शवभूमी स्वतः सावरकरांनीच आपल्या 'माझी जन्मठेप ' ह्या पुस्तकात मांडली आहे. हे पत्र  लिहिण्याआधी ते त्यांचे बंधू बाबाराव सावरकर हे अत्यंत आजारी होते त्यांच्या भावाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. त्या पार्शवभूमीवर हे माफीपत्र त्यांनी पाठवले होते असे त्यांनी स्वतःच लिहिले आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे ह्या माफीपत्रावरून त्याकाळात सुद्धा देशभर गदारोळ उठून सावरकर बंधूंची ह्या अंदमानातील हालांतून सुटका करावी म्हणून देशभरातून निवेदने पाठवली गेली त्यामुळे एक प्रकारे अंदमानात कैद्यांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फुटली असेच म्हणावे लागेल त्यानंतरहे सर्व सरकारकडे पाठवल्यानंतर या गोष्टी लवकरात लवकर व्हाव्यात म्हणून स्वाक्षऱ्यांची मोहीम काढली गेली ह्या सगळ्यानंतर सरकारने सावरकर बधुंची अंदमानातून सुटका एवढच मान्य करून त्यांना भारतात पहिले येरवड्याला(१९२१) नंतर १९२४ साली त्यांना रत्नागिरीला स्थानबद्धतेत रवानगी केली. हा सर्व घटनाक्रम धनंजय कीर यांच्या सावरकर चरित्रात आहे. ह्यानंतर १९३१ साली गांधी- आयर्विन करारात सर्व राजबंद्यांना सोडावे असे असताना सावरकरांना  त्यातून  वगळण्यात आले. सावरकरांची सुटका हि १९३७ साली मुंबई प्रांतातील काँग्रेसच्या प्रांतिक सरकारने केली हा उघड इतिहास आहे. ह्या सर्वांतून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हा वाद निरर्थक आहे, तत्कालीन नेत्यांनीही जे मुख्यतः काँग्रेसचे होते त्यांनी ह्यावर कधीच वाद घातला नाही तसेच स्वातंत्य्रनंतरही ह्या गोष्टीवरून कोणीच वाद घातलेला दिसत नाही , मग आताच हा वाद कशाला? ह्याचा सध्याच्या वास्तवाशी काहीही संबंध नाही.
) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९३७ साली सुटल्यावर हिंदुमहासभेचे अध्यक्षपद स्वकारले काँग्रेसच्या त्या काळातील आंदोलनांवर टीका केली स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात सहभाग घेतला नाही. तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे असा उपदेश केला हा आरोप त्यांच्यावर केला जातो. १९३७ साल नंतर काँग्रेसचे झालेले मुख्य आंदोलन म्हणजे १९४२ सालचे ' चले जाव' आंदोलन. गांधीजींनी जेव्हा ह्या आंदोलनाची घोषणा केली तेव्हा त्यांनी हे आंदोलन शांततेत चालावे असे आवाहन केले होते पण नंतर सगळे नेते पकडले गेल्यावर हे आंदोलन भरकटले, ह्या आंदोलन दरम्यान लोकांनी कित्येकदा हिंसेचा अवलंब केल्याचेही खुद्द इहतिहासाच्या पुस्तकात नमूद आहे. म्हणजे हे आंदोलन त्याच्या उद्द्येश्यापासून भरकटले हे उघड आहे.
सावरकरांवरील आरोप अर्धा खरा आहे ह्याचा कारण म्हणजे सावरकांनी सक्रिय झाल्या पासून हिंदू महासभेच्या मार्फत चळवळीचा कुठलाच कार्यक्रम दिला नाही, शिवाय हिंदूंचे एकत्रीकरण. त्यामुळे सावरकांमुळे चळवळ अपयशी झाली हे म्हणणे चुकीचे ठरेल हवं तर त्यांनी पर्यायी मार्ग दिला नाही हे म्हणायला हवं. सैन्यभरतीच म्हणावं तर इंग्रजांना महायुद्धात साहाय्य करा असा म्हणणारे सावरकर एकमेव नव्हते तर खुद्द गांधींनीच पहिल्या महायुद्धाच्या वेळी लोकांनाही इंग्रजांना मदत करावी म्हणून गोवोगावी फेऱ्या काढल्या होत्या. काँग्रेस सुद्धा दोन्ही महायुद्धांच्या वेळी इंग्रज्यांच्या  बाजूने होती. सैन्य इंग्रजांच्या विरोधात गेल्या शिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही हे अगदी सत्य होते हे नंतर सिद्धही झाले. मग ह्यातून काय निष्कर्ष काढायचा?वाद घालणाऱ्यांना ह्यातून काय सध्या करायचे आहे हेच कळत नाही.
वरील लेख अवास्तव मोठा होण्याच्या भीतीने ह्या आजच्या लेखात ह्या दोनच आक्षेपांचा विचार करू पुढल्या दोघांचा येणाऱ्या लेखात विचार करू. येथे एका प्रवृत्तीचा विचार केला पाहिजे, आजकालपल्या इतिहासातील सर्वच नेत्यांना देव बनवण्याच्या मागे सर्व लागले आहेत. गांधी, शिवाजी महाराज, आंबेडकर हे त्या मालिकेत आधीच गेले आहेत सावरकरांचेही  तेच होण्याच्या मार्गावर आहे, मुळात हे लक्षात घेतले पाहिजे हि हे सर्व लोक आपल्या कर्तृत्वाने इतिहासात अमर झाले आहेत तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाचा, विचारांचा विचार व्हायला हवा तो इतिहास म्हणूनच समजून घ्यायला हवा.

Comments

Popular posts from this blog