सावरकर- एक शोध
आज सर्वत्र चर्चेचे व वादविवादांचे मोहोळ उठले आहे, त्याला मुख्य कारण म्हणजे भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेले सावरकरांना भारतरत्न देण्याचं आश्वासन. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सावरकर हे वादग्रस्त पर्वच म्हणावे लागेल, वादग्रस्त ह्या अर्थी कि गांधीजींच्या बरोबरीने ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त वादंग निर्माण होतात अशी व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. यांच्याबद्दल देशात सर्वत्र वाद आहेत कोणाला त्यांना खलनायक, गांधींचा मारेकरी ठरवायचं आहे तयार कोणाला त्यांना एक महान देशभक्त व त्यांच्या इतका कोणी देशभक्तच नाही असं ठासून सांगायचं आहे इ. टोकाचे मतभेद आहेत. आजच्या लेखाचा मूळ हेतू हा सावरकरांचे विचार नक्की कसे होते, त्यांच्या विचारांमध्ये नावीन्य काय? त्यांच्यावर घेतले जाणारे आक्षेप इ. चा विचार करू. पहिल्या लेखात त्यांच्या विचारांचा आढावा घेऊ आणि पुढच्या लेखात त्यांच्यावरील आक्षेपांचा विचार करू.
सावरकरांच्या जीवनाचा संपूर्ण आढावा घेतला तर त्यांचा त्यांच्या धेय्याशी असलेला प्रामाणिकपणा ठळक दिसतो. त्यांच्या हयातीत त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आलेली दिसते. प्रवाहाच्या विरोधात जाऊन उभे राहणे हे नक्की भारावण्यासारखे आहे. सावरकरांचा लंडन मध्ये जाण्याचा हेतू, त्यांनी लंडन मध्ये केलेले कार्य, हे सर्वच त्यांच्या विचारांना अनुसरूनच दिसते. हा प्रामाणिकपणा त्यांनी नक्कीच आयुष्यभर पाळला. ह्या त्यांच्या विचारांमुळेच व सशस्त्र क्रांतीच्या त्यांच्या विचारांमुळेच ते चळवळीच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे पडले. रत्नागिरीतील स्थानबद्धतेतुन सुटल्यावर त्यांनी पुन्हा हिंदुत्वाची कास धरल्यामुळे ते पुन्हा एकदा वेगळे पडले ते शेवट पर्यंत.
सावरकरांनी सुद्धा तत्कालीन नेत्यांप्रमाणे राजकीय, आर्थिक व सामाजिक विचारांची मांडणी केली. त्यात राजकीय व आर्थिक मांडणीत त्यांनी मांडलेले प्रमुख विचार म्हणजे यंत्रयुगाचे समर्थन, शेती व इतर संलग्न क्षेत्रांसाठी थोड्याफार प्रमाणात मिश्रंअर्थव्यवस्थेचा पुरस्कार, विज्ञानवाद व हिंदुत्वाची संकल्पना. ह्या सर्व विचारांत हिंदुत्वाची संकल्पना सोडली तर नावीन्य काहीच आढळत नाही, कारण अश्याच प्रकारचे विचार टिळक, रानडे इ. लोकांनी मांडलेलेच होते. आता मुद्दा हिंदुत्व संकल्पनेचा तर त्यांनी मांडलेली हि व्याख्या नक्कीच व्यापक होती व त्या व्याख्येचा व त्यांनी मांडलेल्या हिंदुत्वाचा आज सोयीस्कर वापर तरी होतोय किंवा त्याचा विपर्यास होतोय.
आता त्यांच्या सामाजिक विचार व कार्याकडे वळू. ह्या बाबतीतील त्यांच्या कामाचा आजवर नीट काढावाच घेतला गेला नाहीये असाच म्हणावं लागेल.
त्यांनी
रत्नागिरी येथे केलेले कार्य त्यांनी सामाजिक विषमता व अस्पृश्यता यांविरोधात केलेले कार्य आजही लोकांसमोर नीट मांडलंच गेलं नाहीये. त्यांनी उभारलेले पतितपावन मंदिर, त्यांनी तिथे आयोजित केलेली सर्व जातींची सहभोजने, सर्व जातींना समान हक्क मिळावेत म्हणून केलेले काम इ. वर प्रकाश टाकायलाच हवा. त्यांनी मांडलेले विज्ञानवादी व तर्कवादी विचार हे तर अतिशय मोलाचे आहेत. त्यांनी मांडलेलं गोपूजा, हिंदू धर्मातील कर्मकांड इ. बद्दलचे विचार व आज त्यांचा पुरस्कार करताना त्याकडे केले जाणारे दुर्लक्ष हे चक्रावणारे आहे. आज हे विचार नक्कीच लोकांसमोर यायला हवेत.
एकूणच हि सगळी परिस्थितीत बघता सावरकर ह्या नावाचा आदर करताना त्यांच्या खऱ्या विचारांना बाजूला ठेवलं जातंय. काँग्रेसने जे गांधी सोडून कोणीच नाही असं वाईट राजकारण केले त्याला उत्तर म्हणून आज सावरकरांना उभं केले जातंय असं दिसतंय. जे दाखवलं जातंय त्याच्यापेक्षा सत्य नक्कीच वेगळे आहे. त्यामुळे ह्या बाहेर चाललेल्या वादंगांना न भुलता स्वतःच्या बुद्धीने सावरकरांचे विचार मुळातच वाचायला हवेत, त्यांचं चरित्र अभ्यासायला हवं व हेच करणं योग्य ठरेल. जसं गांधींचं झालं तसंच सावरकरांचा होण्याची भीती आहे गांधींच्या अनुयायांनीच त्यांच्या विचारांचा फक्त वापर करून आपला स्वार्थ साधला व त्यांचे मूळ विचार आज समजेनासेच झाले आहेत. तेच सावरकरांचं होईल अशी भीती आहे व तसं होणं हा त्यांच्यावर आतापर्यंत कधीही न झालेला अन्याय ठरेल.
Comments
Post a Comment