आर्थिक मंदी - कारणे
मागील लेखात आपण आर्थिक मंदी म्हणजे काय? ती कश्या प्रकारे भारतात आजच्या घडीला अस्तित्वात आहे हे बघितले. आता हि परिस्थिती नेमकी  कशी अस्तित्वात आली त्याची नेमकी काय कारणे  असू शकतात याचा विचार करायला हवा. पुन्हा एकदा आपण सहज समोर दिसणारे लोकांत चर्चिले जाणारे सर्व मुद्दे बघूया. आपण रोज वर्तमानपत्रे, टीव्ही वरील बातम्या वगैरें मधून जे ऐकतो वाचतो त्याच ढोबळ मुद्द्यांचा विचार करूया.
इथे पहिले एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे कि कुठल्याही अर्थव्यवस्थेत कुठच्याच गोष्टी एकदम उद्भवत नाही तिला आधीपासून घडणाऱ्या खूप गोष्टी कारणीभूत असतात. त्यात देशातील तसेच देशाबाहेरील बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. पहिले देशाबाहेरील गोष्टी घेऊ. पहिले २००८ साली अमेरिकेत आर्थिक संकट जे आलं त्याचे जगभर पडसाद उमटले आणि त्या धक्क्यातून कित्येक अर्थव्यवस्था अजूनही सावरल्या नाहीयेत तो धक्का काय होता किंवा त्या धक्क्याचे नेमके परिणाम त्याची कारणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे त्यामुळे इथे फक्त उल्लेख करू. त्यानंतर पुढची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका-चीन व्यापारयुद्ध ह्याचे सर्व जगावर परिणाम झाले याचं कारण म्हणजे ह्या देशांच्या अर्थव्यवस्था जगात सर्वात बलाढ्य असल्याने त्यांचा आकार त्यांचे असलेले व्यापारसंबंध बघता त्याचा जगावर परिणाम होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे जगभरात  तसं मंदीचंच वातावरण आहे.
  पण आपल्याला  प्रामुख्याने विचार करायचा आहे तो देशातील कारणांचा. कारण भारत हा लोकसंख्येने एवढा मोठा देश आहे ह्या देशात मध्यमवर्गाची एवढी संख्या आहे कि आपल्या देशातील मागणीवरच फक्त देश एक सशक्त अर्थव्यवस्था बनेल. देशात जेव्हा बाजारातील मागणी मंदावते तेव्हा देशातील मध्यवर्ती बँक म्हणजे आपल्याकडे रिझर्व्ह बँक व्याजाचे दार कमी करते त्यामुळे देशात कर्ज स्वस्त होऊन देशातील बाजारात पैसे येतो त्यामुळे मागणी वाढते. आता हि प्रक्रिया कशी होते ते बघूया रिझर्व्ह बँक देशातील इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते किंवा बँक ज्या ठेवी रिझर्व्ह बँकेकडे ठेवते त्यावर जे व्याज देते किंवा घेते त्यामध्ये फेरफार करून बाजारातील पैसे नियंत्रण करते. सध्या रिझर्व्ह बँक सतत व्याजदर कमी करत आहे पण त्याचा फायदा देशाला होत नाही कारण बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता, बँकांची बुडीत खाती कर्जे जवळपास १० लाख कोटी एवढ्या प्रचंड रक्मे पर्यंत पोचल्याने एकतर बँकांकडे नवीन कर्जे द्यायला पैसे नाहीत कर्ज देताना बँक इतकी दक्षता घेतात कि कर्ज घेणे हा एक व्यापच  होऊन बसला आहे.
हे झाले एक कारण, दुसरं  आणि सर्वात महत्वाचं  कारण म्हणजे नोटबंदी. नोव्हे. २०१६ रोजी सरकारने ५०० १००० रु. किमतीच्या नोटा चलनातून बाद  केल्या त्यामुळे देशात प्रचंड गोधळाचं वातावरण तयार झालं, लोकांना  ह्या नोटा बदलून घ्यायला ५० दिवसांची मुदत देण्यात आली त्यात लोकांना त्यांच्या नोटा बदलून घ्यायच्या होत्या त्यामुळे देशात प्रचंड गोधळ उडाला त्यातून सरकारने रिझर्व्ह बँकेने ह्यासाठी कसलीच पूर्वतयारी केल्याने देशात नोटांचा तुटवडा निर्माण झाला   त्यामुळे सामान्य लोकांचं खूप नुकसान झालं. उदा. एक कुटुंब रोजंदारीवर काम करत आहे त्यातील बायको नवरा समजा प्रत्येकी ५००रु. कमावतात महिन्यातून काही दिवस काम काही दिवस  नाही अशी त्यांची अवस्था आहे अश्या लोकांना काही महिन्यांचे पगार ह्या काळात आगाउ दिले गेले त्यामुळे एवढे पैसे ठेवायचे कुठे ते वापरताही येत नाहीत अशी काहीतरी गत झाली. जी गत   ग्राहकांची तीच दुकानदारांची म्हणजे माल आहे तो विकत घ्यायला गिर्हाईक सुद्धा आहे पण चलन नाही जी डिजिटल व्यवस्था पाहिजे ती सुद्धा नाही अशी परिस्थिती झाली ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले ते शेतकऱ्याचे.
आधी ह्या स्थितीतून सावरण्यासाठी ५० दिवस म्हणजे दोन महिने मागितले होते पण प्रत्यक्षात लागले सहा महिने त्यामुळे बाजारात सहा महिने मागणी जवळपास ठप्प असं काहीतरी झालं. ह्या सर्व गोष्टींत भर म्हणून जीएसटी आला त्याचे वेगवेगळे दर  ह्यांमुळे अजूनही त्यात स्थिरता आलेली नाही त्यामुळे सुरु झालेला गोंधळ; अजून संपलेला  नाही त्यामुळे गुंवणूकदार आजही कुठलीच जोखीम घ्यायला तयार  नाहीत. हे सर्व करण्यासाठी जी कारणे सांगितली गेली म्हणजे डिजिटल व्यवहारांची वाढ, काळा पैसे बाहेर काढणे ह्यातील काहीच साध्य झालं नाही असा खुद्द रिझर्व्ह बँकेचा अहवाल सांगतो. यामुळे चांगले निर्णय योग्य अंमलबजावणी नसल्याने फुकट जातात त्याची किंमत सामान्य माणसाला चुकवावी लागते  ती म्हणजे देशातील आजची परिस्थिती.
   वरील सर्व विवेचनातून असलेल्या मंदीची करणे त्यांचे परिणाम ह्यांवर चर्चा केलेली आहे, हि प्रमुख ठळक करणे असून त्यांच्या जोडीला अजूनही कारणे आहेत पण त्यांच्याबद्दल सध्या इथे चर्चा केलेली नाही. ह्या लेखात वापरण्यात आलेल्या अर्थशास्त्रीय संकल्पना ह्या किचकट स्वरूपाच्या असून त्यावर एक स्वतंत्र लेख लिहून त्या समजावून नक्की  देईन. पुढील लेखात यांवर उपाय काय असू शकतात ह्यावर चर्चा करू.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog